पुणे : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका मंजुषा नागपुरे यांची (BJP loyalist and bitter Hindutva supporter Manjusha Nagpure is the candidate for the post of Mayor of Pune) पुणे महापालिकेच्या महापौरपदासाठी उमेदवारी निश्चित झाली आहे. भाजपकडे एकहाती बहुमत असल्याने त्यांची निवड ही केवळ औपचारिकता मानली जात असून, ९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पहिल्या सर्वसाधारण सभेत यावर अधिकृत शिक्का मोर्तब होणार आहे.
महापालिका निवडणुकीप्रमाणेच सध्याही महाविकास आघाडीत अंतर्गत बेबनाव स्पष्टपणे दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार नसल्याची चर्चा होती. मात्र प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी महापौर व उपमहापौर पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आता सभागृहात मतदानाद्वारे निवड होणार असल्याचे स्पष्ट झाले. मंगळवारी अर्ज भरण्याच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापौरपदासाठी नगरसेविका शीतल सावंत, तर उपमहापौरपदासाठी दत्ता बहिरट यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेस पक्षाकडून महापौरपदासाठी अश्विनी डॅनियल लांडगे आणि उपमहापौरपदासाठी साहिल केदारी यांनी अर्ज भरले आहेत. यामुळे महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. पुणे महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा ९ फेब्रुवारी रोजी होणार असून, त्या दिवशी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र, सभागृहातही उमेदवारांना माघार घेण्याची संधी असल्याने मतदान होणार की निवडणूक बिनविरोध होणार, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पुणे महापालिकेत भाजपचे ११९ नगरसेवक निवडून आल्याने पक्षाकडे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे मंजुषा नागपुरे यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
सिंहगड रोडचा प्रथमच महापौर
मंजुषा नागपुरे यांच्या नावाची घोषणा होताच सिंहगड रोड परिसराला प्रथमच महापौरपदाचा मान मिळणार असल्याने स्थानिक पातळीवर आनंदाचे वातावरण आहे. या भागातून यापूर्वी प्रसन्न जगताप उपमहापौर झाले होते. नागपुरे यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
भाजपच्या निष्ठावंत
मंजुषा नागपुरे या सलग तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. यंदाच्या महापालिका निवडणुकीत त्यांनी प्रभाग क्रमांक ३४ मधून बिनविरोध विजय मिळवला होता. स्थायी समितीसारख्या महत्त्वाच्या समितीवर त्यांनी काम केले असून, महापालिकेतील कामकाजाचा त्यांना मोठा अनुभव आहे. त्या भाजपच्या निष्ठावंत आणि कडव्या हिंदुत्ववादी विचारसरणीच्या नगरसेविका म्हणून ओळखल्या जातात.
होती यांच्या नावाची चर्चा
महापौरपदासाठी रंजना टिळेकर, वर्षा तापकीर आणि मानसी देशपांडे यांच्या नावांची चर्चा होती. आमदार योगेश टिळेकर यांना संधी दिल्याने त्यांच्या मातोश्री रंजना टिळेकर यांना महापौरपद नाकारण्यात आल्याची चर्चा आहे. मानसी देशपांडे या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या भावजयी असल्याने त्यांनाही संधी मिळाली नसल्याचे सांगितले जात आहे. तर वर्षा तापकीर यांना सव्वा वर्षानंतर महापौरपद देण्याचे आश्वासन दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
नागपुरे ठरणार दहाव्या महिला महापौर
मंजुषा नागपुरे या पुण्याच्या दहाव्या महिला महापौर ठरणार आहेत. यापूर्वी १९९२ मध्ये कमल व्यवहारे यांनी पुण्याच्या पहिल्या महिला महापौर होण्याचा मान मिळवला होता. नंतर वंदना चव्हाण, वत्सला आंदेकर, दीप्ती चव्हाण, रजनी त्रिभुवन, राजलक्ष्मी भोसले, वैशाली बनकर, दिवंगत चंचला कोंद्रे आणि मुक्ता टिळक यांनी महापौरपदाची धुरा सांभाळली आहे.
अस आहे पुण्यातील पक्षीय बलाबल
- भाजप : ११९
- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) : २७
- काँग्रेस : १५
- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) : ३
- उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना : १