पुणे : पुण्यातील एका सराईत चोरट्याची भन्नाट शक्कल पाहून पुणे पोलिसही आवक झाले.(“Chanakya” rickshaw thief shackled by Kalepadal police) एका रिक्षा चोराला पकडले आणि त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने पुर्ण कहाणीच पोलिसांपुढे उघडली. तो रिक्षा चोरी केल्यानंतर या रिक्षांवर स्क्रॉपमधील जुन्या रिक्षांचे नंबर प्लेट लावून शहरात रिक्षाचालक म्हणून फिरत व्यवसाय करत होता. त्याने अशाप्रकारे ६ रिक्षा चोरून त्याद्वारे शहर भर फिरत असल्याचे समोर आले आहे. काळेपडळ पोलिसांनी चोरट्याला अटक करून त्याच्याकडून १० लाख ७८ हजार रुपये किमतीच्या ६ रिक्षा जप्त केल्या आहेत.
शादाब युसुफ अन्सारी (वय २५, रा. महंमदवाडी रोड, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात वानवडी, काळेपडळ, चंदननगर आणि संत तुकारामनगर पोलिस ठाण्यातील एकूण पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.
काळेपडळ पोलिस हद्दीत गस्त घालत असताना पोलिस अंमलदार महादेव शिंदे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, उंड्री परिसरात चोरीची रिक्षा झाडीखाली उभी आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून शादाब अन्सारी याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने रिक्षा चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर सखोल तपासात त्याने आणखी सहा रिक्षा चोरी केल्याचे उघड झाले. आरोपी चोरी केलेल्या रिक्षांवर स्क्रॉपमध्ये विक्रीस गेलेल्या जुन्या रिक्षांचे नंबर प्लेट लावून शहरातील विविध भागात रिक्षाचालक म्हणून व्यवसाय करत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
ही कारवाई परिमंडळ, राजकुमार शिंदे, सहाय्यक आयुक्त अतुलकुमार नवगिरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अमित शेटे, पोलिस अंमलदार महादेव शिंदे, तसेच लक्ष्मण काळे, विशाल ठोंबरे आणि गिरीराज जगदाळे यांच्या पथकाने केली.