- २७ हजार ४५० विद्यार्थ्यांची वाढ; मुलींच्या संख्येत तब्बल १८ हजार ५८८ ने भर
पुणे, शहर प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने राज्यभरात (Class 12th exams from today across the state; Strict mechanism ready for copy-free campaign) आजपासून (१० फेब्रुवारी) बारावीची लेखी परीक्षा सुरू होत आहे. १८ मार्चपर्यंत चालणाऱ्या या परीक्षेसाठी यंदा १५ लाख ३२ हजार ४८७ विद्यार्थी नोंदणीकृत आहेत. राज्यातील ३,३८७ परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार असून गैरप्रकार रोखण्यासाठी २७१ भरारी पथके, राज्य व जिल्हास्तरीय दक्षता समित्या आणि विविध नियंत्रण यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा पार पडणार आहे.
विद्यार्थ्यांनी वेळेत पोहोचणे आवश्यक
परीक्षार्थींनी किमान अर्धा तास आधी केंद्रावर उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाने केले आहे. परीक्षेदरम्यान तणाव जाणवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरावर १० समुपदेशक नियुक्त असून विभागनिहायही सुविधा उपलब्ध आहे. हेल्पलाईन व नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवण्यात आले आहेत.
सोशल मीडियातून जनजागृती
कॉपीमुक्त अभियान प्रभावी करण्यासाठी ३३ हजारांहून अधिक मुख्याध्यापक व प्राचार्यांना ईमेल, एसएमएस आणि व्हॉट्सॲपद्वारे सूचना पाठविण्यात आल्या आहेत. समाजातील मान्यवरांचे व्हिडिओ संदेशही प्रसारित केले जात आहेत.
सीसीटीव्ही नसलेल्या १७२ केंद्रांवर कर्मचाऱ्यांची बदली
राज्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही अनिवार्य करण्यात आले असले तरी १७२ केंद्रांवर सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांची अदलाबदल करण्यात आली आहे. मंडळाने २४८ केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित केली आहेत.
सांगलीत गुगल मीट, झूमचा वापर
जिल्हा दक्षता समित्यांना स्थानिक नियोजनाचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी ऑनलाइन मॉनिटरिंगसाठी गुगल मीट व झूम प्रणाली वापरण्यात येणार आहे.
यंदाची विद्यार्थ्यांची संख्या (शाखानिहाय)
- विज्ञान – ७,९९,७७३
- कला – ३,८०,६९२
- वाणिज्य – ३,२०,१५२
- व्यवसायाभिमुख – २७,३४८
- टेक्निकल – ४,४९२
- एकूण – १५,३२,४८७
विद्यार्थ्यांमध्ये मोठी वाढ
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा एकूण २७,४५० विद्यार्थ्यांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे मुलींच्या संख्येत १८,५८८ ने वाढ नोंदवली गेली आहे.
कॉपीमुक्त अभियानासाठी कठोर पावले
- परीक्षा केंद्राच्या ५०० मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर बंद
- आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना
- सीसीटीव्ही असलेल्या केंद्रांवर चित्रीकरण
- कर्मचाऱ्यांकडून गैरप्रकार झाल्यास कारवाई
- महाराष्ट्र गैरव्यवहार प्रतिबंध कायदा १९८२ अंतर्गत दखलपात्र, अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्याचा इशारा
विभागनिहाय विद्यार्थ्यांची संख्या
मुंबई विभागात सर्वाधिक ३,५२,७१८, तर कोकण विभागात सर्वात कमी २४,०१३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.