कर्मचाऱ्यांना ‘एनडीआरएफ’ मार्फत प्रशिक्षण द्या
महापौर मंजूषा नागपुरे यांच्या प्रशासनाला सूचना
आपत्ती व्यवस्थापनाचा घेतला आढावा
पुणे, प्रतिनिधी : नवनियुक्त महापाैर मंजुषा नागपुरे यांनी प्रशासनाची पहिली बैठक घेऊन शहरातील आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मान्सूनपूर्व कामांना गती देण्याची सूचना केली. त्यांनी सर्व संबंधित घटकांची तातडीने बैठक घ्यावी, (Create a ward and regional office-wise disaster management team – Mayor Manjusha Nagpure) आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा आढावा घ्यावा, प्रभाग आणि क्षेत्रीय स्तरावर आपत्ती व्यवस्थापन टीमचे सूक्ष्म नियोजन करावे, असेही आदेश दिले.
महापौर नागपुरे यांनी मंगळवारी आपत्ती व्यवस्थापन आणि पावसाळापूर्व कामांसंदर्भात बैठक घेतली. या वेळी स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते ॲड. नीलेश निकम, आयुक्त नवलकिशोर राम, उपायुक्त माधव जगताप व ज्ञानेश्वर खंडारे तसेच अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत महापौरांनी महापालिकेने आतापर्यंत पाणी साचणारी व पूरस्थिती ओढवणाऱ्या ठिकाणी (क्रॉनिक स्पॉट्स) पालिकेने केलेल्या कामाचा आढावा घेत सूचना केल्या. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन निधीतून होत असलेली कामे वेळेत पूर्ण करण्याची सूचना देत नागपुरे म्हणाल्या,‘ पावसाळा काही महिन्यांवर येऊन ठेपला असून पुण्यात पूरस्थिती ओढावत असल्याने प्रशासनाची तयारी असणे आवश्यक आहे. यासाठी महापालिका, जलसंपदा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महामेट्रो, महावितरण, पीएमआरडीए, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, कॅन्टोन्मेंट बोर्ड यांची तातडीने एकत्रित बैठक घ्यावी.
नागपुरे म्हणाल्या, “ओढे, नाल्यांची सफाई, कल्व्हर्टची दुरुस्ती व रिटेनिंग वॉलची कामे वेळेपूर्वी पूर्ण करावीत. गरजेनुसार पावसाळी वाहिन्यांंच्या आराखड्यात सुधारणा करावी. नाल्यांचे मॅपिंग पूर्ण करावे. धोकादायक वाडे, इमारतींचे सर्वेक्षण करून नोटीसा देण्यात याव्यात. झाडांच्या धोकादायक फांद्या तातडीने काढून घ्याव्यात,‘अलिकडे कमी वेळेत अधिक पाऊस होऊन पूरस्थिती ओढवण्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे जलद प्रतिसाद तुकड्यांची (क्यूआरटी) नियुक्ती करावी, गरजेप्रमाणे सेवकसंख्या वाढवावी, शहरासह समाविष्ट गावातील पूर व्यवस्थापनासाठी अधिकचे मनुष्यबळ द्यावे, प्रभावी आपत्ती व्यवस्थापनासाठी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती निवारण दलामार्फत (एनडीआरएफ) प्रशिक्षण द्यावे, अशी सूचनाही महापौर नागपुरे यांनी केली.
महापौरांनी प्रशासनाला केलेल्या सूचना
– प्रभाग आणि क्षेत्रीय कार्यालय स्तरावर आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन करा
– क्विक रिस्पॉन्स टीम अद्यायावत करा
– पूरप्रवण भागात नागरी संरक्षण दलामार्फत नागरिकांना प्रशिक्षण द्या.
– आपत्कालीन निवारा केंद्रांची व्यवस्था करा
– पूरप्रवण भागामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवा