– पेट्रोल पंप व्यवहारासाठी दबाव, भाजप प्रवक्त्यावर गुन्हा दाखल
पुणे, शहरातील प्रतिष्ठीत तसेच प्रसिद्ध असलेल्या पुना क्लबमध्ये पार्किंगच्या किरकोळ कारणावरून क्लबच्या संचालक महिलेला (Director of prestigious Poona Club threatened; Case registered against BJP spokesperson) धमकावण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात भाजपचे प्रवक्ते अली दारूवाला यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत ४७ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. ३० जानेवारी रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.
पोलिसां दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला या पूना क्लबच्या संचालिका आहेत. गेल्या महिन्यात (दि. ३० जानेवारी) तक्रारदार या क्लबमध्ये गेलेल्या होत्या. त्यांनी त्यांचीी कार पार्किंगमध्ये पार्क केलेली होती. त्या क्लबमधील स्विमिंग पूलच्या पार्किंगमधून आपली चारचाकी गाडी बाहेर काढत होत्या. त्याचवेळी दारुवाला हे त्यांच्या दोन साथीदारासह तेथे आले. त्यांनी तक्रारदार यांच्या वाहनाच्या मागे आपली गाडी आडवी लावून त्यांची गाडी बाहेर काढण्यास प्रतिबंध केला. एवढेच नाही तर तक्रारदार यांचा गोल्व्हा नामक व्यक्तीशी असलेला पेट्रोलपंपाचा व्यवहार लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सुरुवातीला बंडगार्डन पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर तो कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला असून त्याचा तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ अधिकार्यांनी दिली.
दरम्यान, संबंधित व्यक्तीशी माझा कोणताही वाद नाही. मी पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा पदाधिकारी आहे. त्या अनुषंगाने मी त्यांना व्यवहार पूर्ण करा, असे सांगत होतो. त्या व्यवहारात मी मध्यस्थी असल्याने त्यांना सांगायला गेलो होतो, असे दारूवाला यांनी या प्रकरणावर बोलताना सांगितले.