पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची पुढाकार
पहिल्या टप्प्यात चार प्रभागात प्रायोगिक अंमलबजावणी
पुणे | प्रतिनिधी, शहरात फोफावत चाललेल्या ड्रग्जला रोखण्यासाठी तसेच त्याचे शहरातून (Corporators will work with the police for a drug-free ward..!) समूळ उच्चाटन करण्यासाठी पुणे पोलिसांनी महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. ‘माझा प्रभाग ड्रग्ज मुक्त’ या उपक्रमांतर्गत थेट नगरसेवकांना सहभागी करून घेतले जाणार आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या उपक्रमाची घोषणा करत पहिल्या टप्प्यात चार प्रभागात प्रायोगिक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या उपक्रमाअंतर्गत संबंधित प्रभागात ड्रग्जची विक्री, साठवणूक किंवा सेवन होणार नाही, याची जबाबदारी पोलिसांसह स्थानिक नगरसेवकांवर सोपविण्यात येणार आहे. शहरातील ड्रग्ज पुरवठा साखळी मोडून काढण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या काही वर्षांत ‘विद्येचे माहेरघर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात ड्रग्जचे जाळे मोठ्या प्रमाणात वाढल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीस आणत कारवाई केली असली, तरी गांजा आणि एमडीसारख्या अमली पदार्थांचा पुरवठा अद्याप सुरू असल्याचे दिसून येते.
नुकत्याच झालेल्या नगरसेवकांच्या जनता दरबार बैठकीत अनेक नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागातील ड्रग्ज व्यवहारांबाबत धक्कादायक माहिती मांडली. यानंतर पोलिस प्रशासनाने अधिक कठोर भूमिका घेत नगरसेवकांच्या सहभागातून हा नवा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
नागरिकांसाठी ‘अँटी ड्रग्ज अॅप’ लवकरच
वाहतूक नियमभंगासाठी असलेल्या ‘पीटीपी अॅप’च्या धर्तीवर आता ड्रग्जविरोधी अॅप विकसित करण्यात येणार आहे. या अॅपद्वारे नागरिकांना फोटो, व्हिडिओ आणि लोकेशन थेट पोलिसांना पाठवता येणार आहे. माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
प्रत्येक पोलिस ठाण्यात अँटी ड्रग्ज पथक
ड्रग्जविरोधी कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात स्वतंत्र अँटी ड्रग्ज पथक स्थापन केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील १० पोलिस ठाण्यांमध्ये ही पथके सुरू करण्यात येतील. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व ४४ पोलिस ठाण्यांमध्ये ही यंत्रणा उभारली जाणार आहे.