पुणे, पुण्यात मोबाईल अन् गिफ्ट शॉपीच्या आडून ड्रग्जची तस्करी होत असल्याचा प्रकार पुणे पोलिसांनी समोर आणला आहे. वाघोलीतून ही धक्कादायक बाब समोर आली असून, पोलिसांनी दोघांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडे केलेल्या तपासात आंतरराज्य रॅकेट देखील उघड झाले आहे.(Drug smuggling under the cover of mobile and gift shops in Pune, police take action) दोघे राजस्थानमधून एमडी (मेफेड्रोन) हा अमली पदार्थ पुण्यात आणून त्याची विक्री केली जात असल्याचेही समोर आले आहे.
मोतीसिंह श्रवणसिंह राजपुरोहित (वय २८), हरीष सुजना रामदेवासी (वय २२, रा. दोघेही वाघोली) अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांसोबतच योगेश उर्फ मनिष बाबुराम बिश्नोई (वय ३०, रा. चामु. जि. जोधपुर, राज्यस्थान), सचिन उर्फ एसके रमेशकुमार बिष्णोई (वय २०) हे दोघे राजस्थानातून पुण्यात येऊन मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा पुरवठा करत होते. सचिन याच्याकडून मांजरी येथील अमित सुनिल घुले (वय ४०, रा. मांजरी) हा ड्रग्ज घेत होता. तो पुढे विक्री करत असल्याचे दिसून आले आहे. या सर्वांना राजस्थानमध्ये ड्रग्ज पुरवठा करणारा व यातील मुख्य पुरवठादार रतनलाल किष्णाराम जाठ (वय २०) यालाही पुणे पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासोबतच पुण्यातील विविध गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी रामकरण जाट उर्फ चौधरी उर्फ सियाग (वय ३४) यालाही पकडण्यात यश आले आहे.
रतनलाल जाठ याच्याकडून राजस्थानातून ड्रग्ज घेऊन तो संबंधित आरोपी पुण्यात पुरवठा करत होते. दरम्यान, खराडी पोलिसांनी वाघोली भागात ड्रग्ज विक्रीप्रकरणात मोतीसिंह राजपुरोहित आणि हरीष रामदेवासी यांना अटक केली होती. या दोघांकडे खराडी पोलिसांनी सखोल तपास केल्यानंतर त्यांना राजस्थानमधून ड्रग्ज पुरवठा होत असल्याचे समोर आले. मग पोलिसांनी ही साखळी उघड केली आहे. त्यामुळे एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांनी एका रॅकेटच्या माध्यमातून तब्बल ६ जणांना अटककरून त्यांच्याकडून ३ कोटी ९२ लाख रुपये किंमतीचा १९६० ग्रॅम एमडी जप्त केला आहे. तर, मोबाईल, महागडी कार आणि इतर ऐवज असा एकूण ४ कोटी २७ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.
ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, तसेच अप्पर पोलिस आयुक्त मनोजकुमार पाटील, पोलिस उपायुक्त सोमय मुंडे, पोलिस उपायुक्त निखील पिंगळे, वरिष्ठ निरीक्षक संजय चव्हाण, गुन्हे शाखेचे पंडित रेजीतवाड, सहाय्यक निरीक्षक राहुल कोळपे, मनोज बागल, पोलिस अंमलदार श्रीकांत शेंडे, महेश नाणेकर, सचिन पाटील, सुरेंद्र साबळे, निलम कर्पे, साहेबराव गुंडाळे, श्रीकांत कोंद्रे, सुरज जाधव, विलास केदारी, अशोक केदार व त्यांच्या पथकाने केली आहे.