कात्रज–कोंढवा रस्त्याचे भूसंपादन १५ दिवसांत, मिसिंग लिंकसाठी बजेटमध्ये तरतूद
पुणे, प्रतिनिधी : पुणे महापालिकेकडून शहरातील स्वच्छता, रस्ते, वाहतूक यांसारख्या दैनंदिन व्यवस्थापनाच्या कामांमध्ये सर्व विभागांमध्ये प्रभावी समन्वय साधून वर्षभरात शहराचा चेहरामोहरा बदलण्याच्या उद्देशाने ‘परिवर्तन कक्षा’ची (Establishment of ‘Transformation Room’ in Pune Municipal Corporation) स्थापना करण्यात आली आहे. या कक्षाअंतर्गत सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी महापालिकेत पार पडली. या बैठकीनंतर आयुक्त राम आणि जिल्हाधिकारी डूडी यांनी पत्रकारांना माहिती दिली.
वर्षानुवर्षे रखडलेले तसेच अपघात आणि वाहतूक कोंडीमुळे कायम चर्चेत असलेल्या कात्रज–कोंढवा रस्त्याचे भूसंपादन पुढील १५ दिवसांत पूर्ण होईल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. खडी मशीन चौक ते उंड्री रस्ता प्रादेशिक विकास आराखड्यानुसार (RDP) विकसित करण्यात येणार आहे. तसेच समाविष्ट गावातील किमान एका प्रमुख रस्त्याचे काम आणि १२ मिसिंग लिंक रस्त्यांच्या विकासासाठी आगामी अंदाजपत्रकात तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली. पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेच्या निमित्ताने विकसित करण्यात आलेल्या रस्त्यांवर कोणत्याही प्रकारची खोदाई करण्यात येणार नाही, असेही ते म्हणाले.
आयुक्त नवल किशोर राम म्हणाले, “नऊ वर्षांनंतर महापालिकेची निवडणूक झाली असून अनेक नवीन नगरसेवक आणि अधिकारी सेवेत दाखल झाले आहेत. पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेच्या निमित्ताने पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, पीडब्ल्यूडी, पोलीस, पीएमआरडीए, बीएसएनएल, वीज मंडळ यांसह सर्व यंत्रणा एकत्र येऊन विक्रमी कालावधीत ४५० किमी दर्जेदार रस्ते तयार करण्यात यशस्वी ठरल्या. यामुळे मर्यादित संसाधनांतही समन्वयाने मोठे बदल घडवता येतात, हे स्पष्ट झाले.”
दर महिन्याला सर्व विभागांची समन्वय बैठक
शहरातील आणि लगतच्या भागातील दैनंदिन सुविधा अधिक दर्जेदार करण्यासाठी पुढील वर्षभर लक्ष केंद्रीत केले जाणार असून, यापुढे दर महिन्याला सर्व विभागांची समन्वय बैठक घेतली जाणार आहे. पाटबंधारे विभागाच्या बेबी कॅनलचा गैरवापर थांबवून तेथे सायकल ट्रॅक विकसित करण्यात येणार आहे. रस्त्यांच्या कामांपूर्वी बीएसएनएलसह अन्य यंत्रणांनी आपली कामे पूर्ण करावीत, यासाठी ओव्हरहेड केबलबाबत एका महिन्यात एसओपी तयार करण्यात येणार आहे.
विजेचे खांब हटवले जाणार
शहरात दीड ते दोन हजार फिडर पॉइंट आणि हजारो विजेचे खांब असून, अनेक ठिकाणी रस्ता रुंदीकरणानंतरही हे खांब हटवले जात नाहीत. त्यामुळे पुढील दोन महिन्यांत अशा अनावश्यक विजेच्या खांबांना हटवण्यासाठी एकत्रित मोहीम राबवली जाणार आहे.
रस्ते चांगले झाल्याने सायकल स्पर्धा झाली – जिल्हाधिकारी डूडी
जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी म्हणाले, “सायकल स्पर्धेमुळे रस्ते झाले असे नाही, तर रस्ते चांगले झाल्यामुळे सायकल स्पर्धा शक्य झाली. ४५० किमी रस्त्यांची दुरुस्ती व स्वच्छता करण्यात आली. २०२६ पर्यंत आणखी रस्त्यांचे लक्ष्य ठेवले असून, एकूण १,५०० किमी रस्ते विकसित करण्याचे टार्गेट आहे. पुण्याला ग्लोबल सिटी बनवताना वेळेत दर्जेदार सेवा देणे आवश्यक आहे.”
अतिक्रमणावर कडक कारवाई
रस्ते रुंदीकरणासाठी अतिक्रमणावर विशेष मोहीम राबवली जाणार आहे. दैनंदिन प्रशासन प्रामाणिकपणे राबवले तर शहरातील किमान ५० टक्के समस्या सुटू शकतात, असा विश्वासही प्रशासनाने व्यक्त केला आहे. यावर्षी समाविष्ट प्रत्येक गावातील किमान एक प्रमुख रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येणार असून, ३० पैकी १२ मिसिंग लिंक रस्त्यांसाठी बजेटमध्ये तरतूद करण्यात आली आहे.