– डीपीआरपूर्वी जीबीची मान्यता आवश्यक
पुणे, प्रतिनिधी : वाकड–कात्रज–शेवाळेवाडी प्रस्तावित असलेल्या मेट्रो मार्गाबाबत पुणे महापालिकेने (First feasibility study of Wakad-Katraj-Shewalewadi Metro line) सावध भूमिका घेत यासंदंर्भाने सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यापूर्वी या मार्गाची तांत्रिक, आर्थिक आणि वाहतूकदृष्ट्या व्यवहार्यता (फिजिबिलिटी) तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानूसार, मार्गाची व्यवहार्यता तपासली जाणार आहे. तसेच प्रक्रियेसाठी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची (जीबी) मान्यता आवश्यक राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महापालिकेच्या प्रकल्प विभागाने २ मार्च २०२६ रोजी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनला (महा मेट्रो) पत्र पाठवून भूमिका स्पष्ट केली. लोकप्रतिनिधींकडून कॉरिडॉरसाठी डीपीआर तयार करण्याची मागणी झाली असली, तरी प्रथम हा मार्ग शहराच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन (सीएमपी) मध्ये समाविष्ट करता येईल का, याची तपासणी होणार आहे. प्रवासी संभाव्यता, अंदाजित खर्च, भूअर्जन, पर्यावरणीय परिणाम आणि विद्यमान वाहतूक व्यवस्थेवर होणारा प्रभाव यांचा सखोल अभ्यास केला जाणार असून, त्यानंतर पुढील टप्प्यावर निर्णय घेतला जाईल. सीएमपीमध्ये समावेश आणि व्यवहार्यता अहवाल सकारात्मक आल्यासच स्थळ पाहणी, प्राथमिक सर्वेक्षण आणि त्यानंतर डीपीआरची प्रक्रिया सुरू होईल.
आंतरजोड मार्ग; पण खर्चिक प्रकल्प
हा मार्ग शहराच्या पश्चिम, दक्षिण आणि पूर्व भागांना जोडणारा महत्त्वाचा आंतरजोड कॉरिडॉर ठरू शकतो. मात्र अशा प्रकल्पासाठी मोठ्या निधीची गरज भासणार आहे. केंद्र-राज्य मान्यता, वित्तीय सहभाग, कर्जउभारणी आणि पर्यावरणीय मंजुरी या टप्प्यांतून प्रकल्पाला जावे लागेल.
निधीअभावी रखडलेले प्रस्ताव
काही मेट्रो मार्ग यापूर्वी निधीअभावी किंवा व्यवहार्यतेअभावी रखडले आहेत. त्यामुळे यावेळी घाईघाईने निर्णय न घेता नियोजनबद्ध पद्धतीने पुढे जाण्याचा महापालिकेचा प्रयत्न दिसून येत आहे. आता महा मेट्रोकडून प्राथमिक फिजिबिलिटी स्टडीबाबत भूमिका स्पष्ट होण्याकडे लक्ष लागले आहे.