पुणे : शहरातील वाहतूक व्यवस्थेला थेट धोका निर्माण करणाऱ्या ट्राफिक सिग्नल (Gang that pushed traffic signals into darkness arrested) चोरी प्रकरणाचा वानवडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ट्राफिक सिग्नल बंद पाडण्यासाठी सिग्नल कंट्रोलर बॉक्समधील बॅटऱ्या चोरणाऱ्या टोळीतील चार जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून तब्बल ३४ बॅटऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत.
दीपक अमोल कांबळे (वय ३२, रिक्षाचालक), चाँद उस्मान शेख (वय २८, स्क्रॅप व्यावसायिक), विकास उर्फ टकल्या विजय माने (वय ३६) आणि अली मुल्ला शेख (वय २७, रा. कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक, उपनिरीक्षक अल्फाज शेख, तसेच अतुल गायकवाड, अमोल पिलाणे आणि त्यांच्या पथकाने केली.
पुणे स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरातील प्रमुख चौकांवरील ट्राफिक सिग्नल वीजपुरवठा खंडित झाला तरी सुरू राहावेत, यासाठी कंट्रोलर बॉक्समध्ये बॅटऱ्या बसवण्यात आल्या आहेत. मात्र, याच बॅटऱ्या चोरट्यांच्या लक्ष्यावर होत्या. काळुबाई चौक, ए.एफ.एम.सी. चौक आणि रेसकोर्स चौक येथील सिग्नल बॉक्समधील बॅटऱ्या चोरीस गेल्याची तक्रार २७ जानेवारी रोजी वानवडी पोलिस ठाण्यात दाखल झाली होती.
सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी ३० जानेवारी रोजी शंकरवस्ती परिसरात सापळा रचला. संशयित रिक्षाला घेराव घालून चारही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान त्यांच्या रिक्षामधून ३४ बॅटऱ्या (अंदाजे किंमत ६८ हजार रुपये), लोखंडी कटावणी आणि चोरीसाठी वापरलेली रिक्षा असा एकूण १ लाख ६८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या चोरीमुळे ट्राफिक सिग्नल बंद पडून अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढू शकला असता. त्यामुळे ही कारवाई वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. चौकशीत आरोपींनी वानवडीसह लक्ष्मीनगर, लष्कर आणि मार्केटयार्ड पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण पाच चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. पुढील तपास सुरू आहे.