पुणे; शिक्रापूर, पाबळ परिसरात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली असून, पतीकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून एका विवाहितेने आपल्या दोन चिमुकल्या मुलांसह विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
अहिला उर्फ भाग्यश्री राजू जाधव (वय ३०), सार्थक राजू जाधव (वय ६) आणि गौरी राजू जाधव (वय ४ महिने) अशी मृतांची नावे आहेत. हे कुटुंब सध्या पाबळ, ता. शिरूर येथे वास्तव्यास असून मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील आहेत. पाबळ येथील एका वीटभट्टीवर कामासाठी असताना भाग्यश्री आणि तिचा पती राजू पांडुरंग जाधव यांच्यात वारंवार वाद होत असल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी दोघांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर भाग्यश्री ही आपल्या दोन लहान मुलांना घेऊन घराबाहेर पडली. बराच वेळ झाला तरी ती घरी न परतल्याने पतीने शोध घेण्यास सुरुवात केली. घरापासून काही अंतरावर असलेल्या परमेश्वर पिंगळे यांच्या विहिरीजवळ सार्थकची सायकल व तिघांच्या चपला आढळून आल्याने संशय बळावला. घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने शोधकार्य राबवले. विहिरीतून भाग्यश्री व तिच्या दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे पाबळ परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी मयत भाग्यश्रीची बहीण जयश्री सुनील जाधव यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी राजू पांडुरंग जाधव (वय ३२) याच्याविरुद्ध महिलेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहेत.