पुणे, मुंबई-पुणे महामार्गावरील आडोशी बोगद्याजवळ गॅस टँकरचा अपघातानंतर ठप्प झालेला मुंबई-पुणे महामार्ग तब्बल ३२ तासानंतर सुरू झाला. (Highway reopens after 32 hours! Unprecedented traffic jam after gas tanker accident)
अपघातग्रस्त टँकरमधून दुसऱ्या टँकरमध्ये गॅस ट्रान्सफर (भरणा) केल्यानंतर मध्यरात्री अडीचच्या सुमारास रस्ता वाहनांसाठी खुला करण्यात आल्याची माहिती महामार्ग पोलिसांकडून देण्यात आली. प्रथमच तब्बल ३२ तास महामार्ग बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
केरळवरून मुंबईच्या दिशेने प्रीपेलीन गॅस घेऊन निघालेल्या गॅस टँकरचा मंगळवारी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास आडोशी बोगद्याजवळ अघात झाला. या अपघातानंतर मुंबईकडे जाणारी लेन बंद पडली. काही तास झाल्यानंतर देखील हा महामार्ग बंदच ठेवावा लागला. टँकरमधून गॅस लिकेज होत असल्याने प्रशासनाला देखील काहीच करता आले नाही. पुर्ण यंत्रणा हतबल झाल्याचेही यामुळे पाहिला मिळाले.
मंगळवारी सायंकाळापसून बंद झालेला महामार्ग पुन्हा सुरू करण्यासाठी प्रशासनाने वेगवेगळे उपाय पाहिले, पण गॅस घातक असल्याने काहीच करता आले नाही. शेवटी संबंधित कंपनीच्या पथकाला पाचारण करण्यात आले. तोपर्यंत पुणे मुंबई महामार्गावर ३० किलोमिटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. प्रवाशांचे प्रचंड हाल सुरू झाले. अनेकांना रुग्णालयात नातेवाईकांकडे, काही महत्वाच्या कामाच्या ठिकाणी तसेच परदेशात जाण्यासाठी वेळेत पोहचता आले नाही. त्यामुळे प्रशासनावर प्रचंड राग व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, रात्री उशिरा गॅसच्या कंपनीकडून अपघात ग्रस्त टँकरमधून दुसऱ्या टँकरमध्ये गॅस ट्रान्सफर करण्याची प्रकिया सुरू करण्यात आली. तब्बल चार तासांनी हा गॅस दुसऱ्या टँकरमध्ये ट्रान्सफर करण्यात आला. नंतर हा टँकर बाजूला काढून मुंबईची लेन सुरू करण्यात आली. मध्यरात्री अडीचच्या सुमारास ही वाहतूक सुरू करण्यात आल्यानंतर महामार्गावरील वाहतूक पुर्वपदावर आली. मंगळवारी सायंकाळी साडेपाचपासून बुधवारी मध्यरात्री अडीचपर्यंत म्हणजे, तब्बल ३२ तास यामुळे महामार्ग बंद ठेवावा लागला. इतिहासात प्रथमच अशी वेळ आल्याचे देखील सांगण्यात आले. यापुर्वी अपघातामुळे काही तास महामार्ग बंद ठेवावा लागला होता, पण तो काही तासांसाठी. परंतु, इतका वेळ प्रथमच महामार्ग बंद राहिला.