रोहित पवारांकडून सीआयडीकडे कागदपत्रे जमा
पुणे, प्रतिनिधी – दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा (Investigation of plane crash in wrong manner – MLA Rohit Pawar’s demand) तपास चुकीच्या पद्धतीने सुरू असून, हा तपास योग्य दिशेने होण्यासाठी केंद्रीय नागरी उड्डा णमंत्री राम मोहन नायडू यांनी राजिनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. गुरूवारी त्यांनी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग येथे दाखल होऊन अप्पर पोलिस महासंचालक सुनील रामानंद यांची भेट घेतली. त्यांना काही कागदपत्रे देखील सादर केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
गेल्या महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारी रोजी सकाळी विमान अपघातात मृत्यू झाला. याप्रकरणात अपघाती मृत्यूप्रकरणी सीआयडीकडून तपास सुरू आहे. दरम्यान, रोहित पवार यांनी अपघाती मृत्यूप्रकरणात जीडीसीए (डायरेक्टर जनरल अॅफ सिव्हील एव्हिएशन) आणि व्हीएसआर कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी रोहित पवार यांनी मुंबई आणि बारामती पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे ते गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) येथे दाखल झाले होते.
रोहित पवार म्हणाले की, व्हीएसआर कंपनीचे मालक रोहित सिंग हे तेलगु देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्याशी संबंधित आहेत. त्यांच्या कंपनीला चंद्राबाबूंनी आर्थिक रसद आहे. तसेच चंद्राबाबूंच्याच पक्षाचे खासदार राम मोहन नायडू हे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री आहे. विमान अपघात झाल्यानंतर राम मोहन नायडू यांनी विमानाची तपासणी योग्य पद्धतीने झाल्याचे सांगितले होते. नंतर आता व्हीएसआर कंपनीच्या विमानात दोष असल्याचे जीडीसीएने जाहीर केले. तसेच, त्याच कंपनीच्या पाच विमानांवर कारवाई देखील केली. यावरून विमान कंपनीच्या मालकास कोणी तरी वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, हे स्पष्ट होते. याचा तपास चुकीच्या दिशेने केला जात आहे. हा तपास निस्पक्षपातीपणे होण्यासाठी केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री राम मोहन नायडू यांनी राजिनामा द्यावा. तसेच तेलगु देसम पक्षाच्या कोणत्याही नेत्याला हे मंत्रालय देऊ नये. विमान कंपनीच्या भाजपच्या काही नेत्यांचाही संबंध आहे, त्यामुळे ते मला लक्ष करत आहेत, असेही रोहित पवार म्हणाले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना बिनविरोध आमदार करावे
राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकी यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांचे मी अभिनंदन करतो. बारामती विधान सभेच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा काकी यांच्या विरोधात कोणत्याही उमेदवाराने उभे राहू नये, त्यांची निवड बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षाही रोहित पवार यांनी व्यक्त केली.
कुणाच्या घाराची व ब्युटी पार्लरची बिले पक्षाच्या खात्यातून गेली….
राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केलेल्या टिकेला उत्तर देताना रोहित पवार म्हणाले, आम्हाला अजित दादांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत. त्या बोलण्याची वेळ येऊ देऊ नका. कोणाच्या घरातील कामाची बिले आणि कोणाच्या ब्युटी पार्लरची बिले पक्षाच्या खात्यातून दिली आहेत, याची माहिती आमच्याकडे आहे.