- ‘कलर कल्चर’ कार्यक्रमात स्टेजचा लोखंडी खांब कोसळला; चौघे जखमी
- मुंढवा येथील रॉयल येथील प्रकार
पुणे, पुण्यात होळी तसेच धुलीवंदनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात मोठी (Major accident in Pune during Dhuli Vandana program; Fortunately, no one lost their lives… but) दुर्घटना घडली. सुदैवाने मात्र, कोणाच्याही जिवावर बेतले नाही. परंतु, यामध्ये चाैघे जखमी झाले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी कारवाईला सुरूवात केली आहे. मुंढवा येथील रॉयल पाम्स येथे आयोजित केलेल्या ‘कलर कल्चर’ या कार्यक्रमात स्टेजवरील आडवा लोखंडी खांब अचानक कोसळला गेला आणि एकच गोंधळ उडाला. डीजेच्या तालावर नाचणार्या तरुणांची एकच धावपळ उडाली आणि गोंधळ सुरू झाला. याघटनेत चार जण किरकोळ जखमी झाले, असल्याचे या परिमंडळाचे पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी सांगितले. ते म्हणाले याप्रकरणात कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
याप्रकरणी मुंढवा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
मुंढवा पोलिसांच्या माहितीनुसार, होळी व धुलीवंदनाच्या जल्लोषासाठी कलर कल्चर या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तर त्यासाठी मोठे टेंट उभारले होते. यावेळी मोठा संख्येने तरुणाई उपस्थितीत होती. डीजेच्या तालावर रंगांची उधळण सुरू असताना अचानक स्टेजजवळ उभारलेला लाइटिंगचा आडवा लोखंडी खांब खाली कोसळला. हा खांब थेट समोर उभ्या असलेल्या काही जणांच्या अंगावर पडल्याने एकच गोंधळ उडाला.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, खांब कोसळण्याची घटना इतकी अचानक घडली की उपस्थितांना सावरण्याची संधीच मिळाली नाही. काही जण खाली पडले, तर काहींना डोक्याला व हातापायांना दुखापत झाली. या घटनेनंतर जखमींना रुग्णवाहिकेद्वारे जवळच्या रुग्णालयात हलवले. घटनेची माहिती मिळताच मुंढवा पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ निरीक्षक स्मिता वासनिक यांनी इतर अधिकाऱ्यांसह भेट देऊन पाहणी केली.
कार्यक्रमासाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या होत्या का, तसेच स्टेज व लाइटिंगची संरचना सुरक्षितपणे उभारलेली होती का, याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, लोखंडी खांब योग्यरीत्या मजबुतीकरण न केल्याने किंवा गर्दी व मोठ्या आवाजामुळे निर्माण झालेल्या कंपामुळे तो कोसळल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.