– मुंढवा शासकीय जमीन विक्रीप्रकरण; सुर्यकांत येवले, दिग्विजय पाटील यांच्यासह इतरांचा तपास सुरू, बोपोडी प्रकरणाचाही उल्लेख
पुणे, प्रतिनिधी, मुंढवा येथील कोट्यवधी रुपयांच्या शासकीय जमिनीच्या बेकायदेशीर विक्रीप्रकरणात (Mundhava government land sale case) मुख्य आरोपी शीतल तेजवाणी हिच्याविरोधात पुणे पोलिसांनी तब्बल १८८६ पानांचे सविस्तर दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. अटकेनंतर ६० दिवसांच्या आत दोषारोपपत्र दाखल करण्याच्या कायदेशीर मुदतीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
मुंढवा परिसरातील सुमारे ४० एकर शासकीय जमीन ३०० कोटी रुपयांना अमेडिया कंपनीला (Amedia Company) विक्री केल्याप्रकरणी तहसीलदार सुर्यकांत येवले, हेमंत गवंडे, दिग्विजय पाटील, शीतल तेजवाणी यांच्यासह इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा पुण्यातील खडक पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला असून, प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून (EOW) सुरू आहे.
सूत्रधार असल्याचा पोलिसांचा दावा
या प्रकरणात शीतल तेजवाणी हिला ३ डिसेंबर २०२५ रोजी अटक करण्यात आली होती. तपासादरम्यान ती या व्यवहाराची प्रमुख सूत्रधार असल्याचे समोर आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. महार वतनांच्या वारसदारांकडून पॉवर ऑफ अॅटर्नी करून घेत त्यातील काही वारसदारांना धनादेश दिल्याचेही तपासात उघड झाले आहे. त्यानंतर ही शासकीय जमीन अमेडिया कंपनीला विक्री करण्यात आल्याचे दोषारोपपत्रात नमूद आहे.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत तेजवाणीला अटक केली होती. तपासादरम्यान वारसदारांसह इतर आरोपींचे जबाब नोंदवण्यात आले असून, कागदपत्रांची सखोल पडताळणी करण्यात आली आहे.
६० दिवसांची मुदत पूर्ण; दोषारोपपत्र दाखल
मंगळवारी (दि. ३ फेब्रुवारी) शीतल तेजवाणीच्या अटकेला ६० दिवसांचा कालावधी पूर्ण होत असल्याने, त्याआधीच पुणे पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. मात्र, सध्या हे दोषारोपपत्र केवळ तेजवाणीपुरते मर्यादित असून, उर्वरित आरोपींबाबत तपास सुरू आहे.
इतर आरोपींचा तपास सुरू
न्यायालयात सादर केलेल्या दोषारोपपत्रात सुर्यकांत येवले, दिग्विजय पाटील यांच्यासह इतर संशयितांची भूमिका अद्याप स्पष्ट नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. आवश्यक पुरावे, व्यवहारांची साखळी आणि कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
बोपोडी प्रकरणाचाही उल्लेख
महत्त्वाचे म्हणजे, या दोषारोपपत्रात बोपोडी येथील शासकीय जमीन विक्रीप्रकरणाचा तपासही सुरू असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. मुंढवा आणि बोपोडी या दोन्ही प्रकरणांमध्ये काही समान धागे असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत असून, दोन्ही प्रकरणांचा एकत्रित अभ्यास सुरू आहे.