पुणे : प्रतिनिधी, जिल्ह्यात प्रथमच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविना पार पडलेल्या पुणे जिल्हा परिषद (NCP’s unilateral power in Pune Zilla Parishad; Holds on even after Ajit Pawar) निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने दमदार कामगिरी करत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. या निकालाने जिल्ह्यातील पक्षाची मजबूत पकड पुन्हा एकदा अधोरेखित झाली. हा निवडणूक सामना केवळ सत्तेसाठी नव्हता, तर राजकीय प्रतिष्ठेची लढाई म्हणूनही पाहिला जात होता. जिल्हा परिषदेतल्या ७३ गटांसाठी एकूण २९९ उमेदवार रिंगणात होते. निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने बहुमताचा ३७ चा टप्पा ओलांडत तब्बल ४४ जागा जिंकल्या आणि एकहाती सत्ता मिळवली.
ग्रामीण भागात मतदारांचा कल स्पष्टपणे राष्ट्रवादी काँग्रेसकडे झुकलेला दिसला. मजबूत संघटन, बूथपातळीवरील कार्यकर्ते आणि वर्षानुवर्षे तयार झालेले सामाजिक-राजकीय संबंध हे या विजयामागील महत्त्वाचे घटक मानले जात आहेत. काही ठिकाणी राष्ट्रवादीच्या विविध गटांमध्ये समन्वयही पाहायला मिळाला. विरोधकांकडून भाजप आणि शिवसेनेने जोरदार लढत दिली. मात्र अपेक्षित यश मिळाले नाही. विशेषतः पुरंदरमध्ये शिवसेनेला एकही जिल्हा परिषद जागा मिळाली नाही, हा मोठा धक्का मानला जात आहे.
पंचायत समिती स्तरावर वेगवेगळे निकाल दिसून आले.
जुन्नरमध्ये शिवसेना (शिंदे गट) आघाडीवर
खेडमध्ये शिवसेना (उद्धव गट) पुढे
बारामती, वेल्हे, मुळशी, शिरूर, आंबेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव
भोरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी प्रत्येकी ४ सदस्य निवडून आल्याने सभापतीपदासाठी पेच निर्माण झाला आहे. पुरंदरमध्ये ४ राष्ट्रवादी, २ शिवसेना आणि २ भाजप सदस्य निवडून आले असून आघाड्यांची गणिते महत्त्वाची ठरणार आहेत.
असे आहे तालुकानिहाय चित्र
बारामती – सर्व ६ जागा राष्ट्रवादी
मावळ– ५ पैकी ५ राष्ट्रवादी
दौंड– ७ पैकी ६ राष्ट्रवादी
वेल्हा– दोन्ही जागा राष्ट्रवादी
इंदापूर– ८ पैकी ५ राष्ट्रवादी
शिरूर– ७ पैकी ४ राष्ट्रवादी
खेड– ५ जागा शिवसेना (उद्धव गट)
जुन्नर– राष्ट्रवादी ४, शिवसेना ३, उद्धव गट १
पक्षनिहाय एकूण निकाल
राष्ट्रवादी काँग्रेस – ४४
भाजप – ९
शिवसेना (उद्धव गट) – ६
शिवसेना – ४
राष्ट्रवादी (शरद पवार गट) – १
काँग्रेस – शून्य