– कोथरूडमधील धक्कादायक घटना; दहा जणांवर गुन्हा
- पोलिसांनी पाच महिलांसह सात जणांना पकडले
- तिघांचा पोलिसांकडून शोध
पुणे, प्रतिनिधी
सैराट चित्रपटाशी मिळतीजुळती घटना पुण्याच्या कोथरूडसारख्या उच्चभ्रु आणि उच्चशिक्षीत परिसरात घडली असून, (Opposition to love, murder of a young man by his family in Pune..!) कुटूंबाने प्रेमाला विरोधकरून एका तरुणाला लाकडी दांडक्याने एकत्रित येऊन बेदम मारहाणकरत त्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. इमारतीच्या टेरेसवर नेहून त्या तरुणाला या सर्वांनी मारहाण केली. याघटनेमुळे पुण्यात मोठी खळबळ देखील उडाली आहे. पुणे पोलिसांनी गुन्हा नोंदकरून सात जणांना अटक केली.
नागेश संजय जाधव (वय २३, रा. जुनी वडारवाडी, मंजाळकर चौक, शिवाजीनगर) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याची आई सुरेखा संजय जाधव (वय ४५, रा. जुनी वडारवाडी) यांनी कोथरुड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. यानुसार पोलिसांनी वृषाली अनिल शिंदे, सुनिता सुनिल शिंदे, जयश्री लक्ष्मण शिंदे, तुळशी योगेश शिंदे, गंगा संजय पवार, माणिक संजय पवार, सुनिल शिंदे, पोपट शिंदे, योगेश शिंदे, अनिल शिंदे (सर्व रा. मेगासिटी, एसएनडीटीजवळ, कोथरुड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागेश जाधव हा शिवाजीनगर भागातील एका खासगी कार्यालयात ‘ऑफिस बॉय’ म्हणून काम करत होता. तो जुनी वडारवाडी परिसरात राहण्यास होता. त्याची आई ही मार्केटयार्ड परिसरात कामे करत होती. दरम्यान, नागेशचे पौड फाटा चौक परिसरातील मेगा सिटी इमारतीत राहणाऱ्या एका तरुणीशी त्यचे प्रेमसबंध होते. प्रेमसंबधाला तरुणीच्या नातेवाईकांचा विरोध होता. शनिवारी (१४ मार्च) सायंकाळी सव्वासातच्या सुमारास नागेशच्या मोबाइलवर संपर्क साधून तरुणीच्या नातेवाईकांनी त्याला पौड फाटा चौक येथील मेगा सिटी इमारतीत बोलावून घेतले. त्याला तीच बोलवत असल्याचे वाटल्याने नागेश दुचाकीवरुन तेथे गेले. नंतर रात्री आठच्या सुमारास आरोपींनी नागेशच्या आईच्या मोबाइलवर संपर्क साधला.
’तुमच्या मुलाला आम्ही मारले आहे. दहा मिनिटात मुलाला घेऊन जा. अन्यथा त्याला आम्ही इमारतीतून फेकून दे”, अशी धमकी आरोपींनी दिली. नंतर आरोपींनी मोबाइल बंद केला. नागेशची आई घाबरली. त्या कर्वे रस्त्यावरील मेगा सिटी इमारतीच्या आवारात आल्या. त्यांनी रहिवाशांकडे विचारणा केली. तेव्हा नागेशला मेगा सिटी इमारतीच्या गच्चीवर आरोपी मारहाण करत असल्याचे आईने पाहिले. नागेश गंभीर जखमी झाला होता. त्याने आईला मारहणीबाब माहिती दिली. नागेशला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी त्याला घेउन त्या रिक्षाने निघाल्या. माझे एका मुलीशी प्रेमसंबंध होते, असे नागेशने आईला सांगितले. तिने त्याला मेगा सिटी परिसरात बोलावून घेतले. तिची आई, काकू, तसेच नातेवाईकांनी नागेशला दांडक्याने मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाल्याचे नागेशच्या आईने तक्रारीत म्हटले आहे. नागेशला खासगी रुग्णलायातून ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल माने तपास करत आहेत.