पुणे, प्रतिनिधी : शहर पोलिस दलात मोठी खळबळ उडवणारी कारवाई करत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील तब्बल ३२ कर्मचाऱ्यांच्या एकाचवेळी बदल्या केल्या आहेत. या निर्णयामुळे पोलिस दलात चर्चांना उधाण आले आहे.(Police Commissioner’s big action; Mass transfers of 32 employees of Loni Kalbhor police station)
शहरात अवैध धंदे, अवैध दारू विक्री तसेच अमली पदार्थविरोधी कारवायांबाबत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कडक भूमिका घेतली आहे. कोणतीही माहिती कानावर येताच ते वैयक्तिक लक्ष घालून तातडीने कारवाई करत असल्याचे चित्र आहे. तरीही शहरात अधूनमधून अवैध प्रकार सुरू असल्याचे समोर येत आहे.
लोणी काळभोर पोलिस ठाणे शहराच्या टोकाला असल्याने तेथील घडामोडी वरिष्ठांच्या नजरेतून सुटतात, असा समज व्यक्त केला जातो. मात्र, गेल्या काही महिन्यांत या ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांबाबत सातत्याने तक्रारी येत होत्या. ड्रग्जविरोधी कारवाया देखील झाल्या होत्या. या प्रकरणांत काही अंमलदारांचे नाव चर्चेत आले होते.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची (एसीबी) कारवाई अपयशी ठरल्याची चर्चा होती. तसेच एका ‘झीरो’ला गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन चौकशी केली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर त्याने काही पोलिस कर्मचाऱ्यांची नावे घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या कामकाजावर विशेष लक्ष केंद्रीत केले होते. बुधवारी अचानक एकाचवेळी ३२ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. पोलिस दलात याला ‘भाकरी फिरवणे’ असे संबोधले जात असून, ही कारवाई धक्कादायक मानली जात आहे.
वरिष्ठांवरही लक्ष
या प्रकरणात संबंधित ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही अतिवरिष्ठांचे लक्ष असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कोणतीही अनियमितता आढळल्यास पुढील कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या सामूहिक बदल्यांमागील अधिकृत कारण स्पष्ट करण्यात आलेले नसले तरी, संबंधित कर्मचाऱ्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने बदल्या केल्याचे सांगितले जात आ