पुणे, प्रतिनिधी : बुधवार पेठ परिसरात चार दिवसांपूर्वीच सर्च ऑपरेशन राबविल्यानंतर पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा विशेष मोहिम हाती घेत मोठी कारवाई केली. (Police crackdown again in Budhwar Peth; 11 Bangladeshi women arrested)कारवाईत तब्बल ११ बांगलादेशी महिलांना अटक केली आहे. तर, ११ महिलांची कसून चौकशी करण्यात आली. एकूण २२ महिलांना संशयावरून ताब्यात घेतले होते.याप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खडक आणि फरासखाना पोलिसांच्या संयुक्त पथकाने संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकून ही कारवाई केली.
पोलिसांना खास खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, ही कारवाई करण्यात आली. याठिकाणी बांगलादेशी महिला असल्याचे समजताच पोलिसांनी अचानक एका कुंठण खान्यावर छापा टाकला. तसेच, २२ महिलांना ताब्यात घेतले. या महिलांपैकी ११ महिलांनी भारतीय नागरिक असल्याची कागदपत्रे सादर केली. त्यांची पडताळणी करण्यात येत आहे. तर उर्वरित ११ महिलांपैकी सहा महिलांनी चौकशीत आपण बांगलादेशी नागरिक असल्याची कबुली दिली, तर पाच महिलांची कागदपत्रे तपासल्यानंतर त्या देखील बांगलादेशी नागरिक असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांकडून संबंधित कुंटणखाना सील करण्याचा प्रस्ताव पोलिस आयुक्तांकडे पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे.दलाल आणि रॅकेटचा तपास
संबंधित महिलांना बुधवार पेठेत आणणारी टोळी, दलालांची भूमिका, आर्थिक व्यवहार तसेच मानवी तस्करीच्या साखळीबाबत सखोल तपास सुरू आहे. परदेशी नागरिकांच्या बेकायदेशीर वास्तव्यासंदर्भात संबंधित विभागांनाही माहिती देण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले. मानव तस्करी आणि बेकायदेशीर वेश्याव्यवसायाविरोधात अशी कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कोम्बिंग ऑपरेशन निष्फळ?
गेल्या आठवड्यात पोलिसांनी बुधवार पेठ परिसरातील ३९ कुंटणखान्यांवर छापे टाकत सुमारे ७०० जणांची तपासणी केली होती. त्यावेळी काही अल्पवयीन मुलींना ताब्यात घेण्यात आले होते तसेच एका बांगलादेशी महिलेला अटक करण्यात आली होती. मात्र अवघ्या काही दिवसांतच पुन्हा मोठ्या संख्येने बांगलादेशी महिला आढळल्याने, मागील मोहिमेदरम्यान त्या हाती का लागल्या नाहीत? त्यांना दुसरीकडे हलवून नंतर पुन्हा येथे आणले गेले का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिस तपासातून याबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.