पुणे प्रतिनिधी : शहरात होळी आणि धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्यांवर पुणे शहर पोलिसांनी विशेष मोहीम राबवत कारवाई केली.(Police crackdown on ‘drunk and drive’ on Holi; action taken against 455 drivers in Pune) एका दिवसात तब्बल ४५५ चालकांवर ड्रंक अँड ड्राईव्ह अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यांच्याकडून दंड देखील वसूल करण्यात आला आहे. या कारवाईने वाहन चालकांना चांगलाच दणका बसला आहे.
शहरात होळीनिमित्ताने धुलीवंदनाला विविध भागांत पार्ट्या, डीजे कार्यक्रम आणि उत्सवी वातावरण होते. मात्र काहीजणांनी मद्यप्राशन करून वाहन चालवत स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घातला. रस्त्यांवरच सुसाट वाहने पळविली जात होती. त्यामुळे अपघात होण्याची देखील शक्यता होती. हे टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी शहरातील प्रमुख चौक, महामार्ग आणि गर्दीच्या सुमारे ३० ठिकाणी नाकाबंदी करून तपासणी केली.
मंगळवारी दिवसभर तसेच उशिरा रात्रीपर्यंत सुरू असलेल्या या मोहिमेत ४५५ चालक मद्यधुंद अवस्थेत आढळून आले. संबंधितांवर न्यायालयीन कारवाई करण्यात येणार असून, वारंवार नियमभंग करणाऱ्यांवर कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलिसांकडून पाठपुरावा केला जाणार आहे. दरम्यान, कारवाई करण्यात आलेल्या सर्वांना बुधवारी येरवडा येथील वाहतूक शाखेच्या कार्यालयात बोलावून समुपदेशन करण्यात आले. भविष्यात अशी चूक पुन्हा होऊ नये, यासाठी पोलिसांनी त्यांना सक्त ताकीद दिली.