पुणे : प्रतिनिधी, शहर पोलीस दलातील बहुप्रतिक्षित भरती प्रक्रियेला १६ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. पोलीस शिपाई, वाहनचालक आणि बँडमन पदांसाठी एकूण १ लाख ३९ हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. याशिवाय कारागृह विभागातील १३३ शिपाई पदांसाठी तब्बल ४६ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत.
पुणे पोलीस दलात १६३३ शिपाई, १०५ वाहनचालक आणि ३३ बँडमन पदांसाठी भरती होणार आहे. मैदानी चाचण्या शिवाजीनगर पोलीस मुख्यालय आणि रामटेकडी येथील राज्य पोलीस दलाच्या मैदानावर घेतल्या जाणार आहेत. १६ फेब्रुवारीपासून शारीरिक चाचणी सुरू होईल, त्यानंतर पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल.
अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, भरती प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. उमेदवारांची उंची, छाती मोजणीसह १०० मीटर धावणे, पुरुषांसाठी १६०० मीटर व महिलांसाठी ८०० मीटर धावणे, तसेच गोळाफेक या चाचण्या होणार आहेत.
गैरप्रकार टाळण्यासाठी आरएफआयडी तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून संपूर्ण प्रक्रिया सीसीटीव्ही निगराणीखाली असेल. त्यामुळे धावण्याची वेळ आणि कामगिरीची अचूक नोंद होईल. मानवी हस्तक्षेप कमी राहील, याची खबरदारी घेण्यात आल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
लेखी परीक्षेदरम्यान विशेष सुरक्षा उपाययोजना करण्यात येणार आहेत. परीक्षा केंद्रांवर कडक बंदोबस्त राहील. उमेदवारांनी कोणत्याही मध्यस्थांच्या किंवा दलालांच्या भूलथापांना बळी पडू नये. गैरप्रकार आढळल्यास ७३९१०८२६११ या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.