पुणे, प्रतिनिधी : थंडी अन् पावसाप्रमाणेच यंदाचे वर्ष पुणेकरांना प्रचंड गर्मीचे जाणार असल्याचे जाणवू लागले (Pune heats up in early March; mercury exceeds 35 degrees for two consecutive days) असून, मार्चच्या पहिल्या आठवड्यात पुणे शहर आणि परिसरात उन्हाचा कडाका वाढल्याचे चित्र आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव कमी झाल्याने तापमानात सातत्याने वाढ होत आहे. शहरात सलग दोन दिवस कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. त्यामुळे पुणेकरांना उन्हाळ्याच्या झळा आतापासूनच जाणवू लागल्या आहेत. त्यात तापमानात दुपारी गर्मी जाणवत आहे. तर पहाटे थंडीची हलकी झुळूक येत आहे.
शहरात बुधवारी (दि. ४ मार्च) १६.७ अंश सेल्सिअस किमान तर ३६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दिवसभर आकाश मुख्यतः निरभ्र राहिल्याने दुपारच्या वेळेस उकाड्यात अधिक भर पडली. सकाळी वातावरणात किंचित गारवा जाणवत असला तरी दुपारनंतर तापमान झपाट्याने वाढत असल्याचे चित्र होते. दुपारी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना कडक उन्हाचा सामना करावा लागला.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, गुरुवारी (ता. ५) किमान तापमानात किंचित घट होऊन ते सुमारे १६ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. मात्र कमाल तापमान ३६ अंशांच्या आसपास स्थिर राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आकाश निरभ्र राहणार असल्याने उष्णतेचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, शनिवारपासून (ता. ७) किमान आणि कमाल तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मार्चच्या प्रारंभीच तापमानाने घेतलेली ही झेप आगामी दिवसांत अधिक तीव्र उन्हाळ्याचे संकेत देत आहे.