पुणे, प्रतिनिधी : शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागाने कडक (Pune residents pay fine within 30 days, otherwise license will be cancelled! Pune Police warns) धोरण स्विकारले असून, वाहतूक नियमांचे उल्लंघन करून थकित दंड न भरणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध आता कठोर कारवाई केली जाणार आहे. थकित दंड ३० दिवसांच्या आत न भरल्यास संबंधित वाहनचालकाचा परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन विभागाकडे (आरटीओ) पाठवण्यात येणार असल्याचा इशारा वाहतूक विभागाने दिला आहे. वाहतूक नियमभंग करून दंड थकवणाऱ्या वाहनधारकांना अधिकृत नोटीस पाठवली जात आहे. नोटीस मिळाल्यानंतर ३० दिवसांच्या आत दंड भरणे बंधनकारक असेल. अन्यथा परवाना निलंबनासोबतच प्रकरण न्यायालयात दाखल करण्याची कारवाईही केली जाणार आहे.
शहरातील वाहतूकीला शिस्त लावण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. पुणे पोलिसांनी शिस्तीसोबतच नियभंग करणाऱ्यांवर जोरदार कारवाई सुरू केली आहे. तर, थकित दंड वसूल करण्यासाठी देखील पावले उचलली आहेत. यादृष्टीने आता परवाना रद्दचा पर्याय समोर आणण्यात आला आहे. वाहन चालक बिंदास नियभंग करत असल्याचे तसेच दंड ठोकल्यानंतर देखील तो भरत नसल्याचे निदर्शनास आले आहे. यापार्श्वभूमीवर ही कारवाई सुरू करण्यात आली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
पुणे पोलिसांकडून २६, २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च या कालावधीत संबंधित वाहनधारकांना नोटिसा पाठवण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी थकित दंडाकडे दुर्लक्ष न करता तात्काळ तो भरावा, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे. वाहतूक शिस्तीबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असून, नागरिकांनी नियमांचे पालन करून शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
असा भरा थकित दंड
वाहनधारकांना दंड भरण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत:
पीटीपी अॅपद्वारे ऑनलाईन भरणा
चौक-चौकात वाहतूक नियमनासाठी तैनात असलेल्या अमलदारांकडे थेट भरणा
जवळच्या वाहतूक विभाग कार्यालयात दंड जमा
अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाईन पेमेंट
दंडाची रक्कम डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे भरता येणार आहे.