पुणे, प्रतिनिधी : पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या १८ मार्च रोजी अध्यक्षाची निवड (Pune Zilla Parishad; 3 names for BJP group leader post to seniors) होणार आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्याने अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे जाणे निश्चित आहे. दुसरीकडे भाजपमध्ये गटनेतेपदासाठी हालचाली सुरू झाल्या असून, स्थानिक पातळीवरून तीन नावे पक्षाच्या वरिष्ठांकडे पाठविली गेली असून, पुढील दोन दिवसांत अंतिम निर्णय अपेक्षित आहे.
पुणे जिल्हा परिषदेत भाजपचे एकूण १० सदस्य निवडून आले आहेत. शिरूर तालुक्यातून सर्वाधिक तीन सदस्य विजयी झाले आहेत. भोर आणि पुरंदर तालुक्यातून प्रत्येकी दोन, तर मुळशी, दौंड आणि हवेली तालुक्यांतून प्रत्येकी एक सदस्य निवडून आला आहे. त्यामुळे गटनेतेपदासाठी शिरूर, भोर आणि पुरंदर या तालुक्यांत चुरस निर्माण झाली आहे.
शिरूरमधून राजेंद्र गावडे, कांचन सांडभोर आणि सुनिता कड विजयी झाले असून राजेंद्र गावडे यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे. पुरंदरमधून अजय कैलास इंगळे आणि हरिभाऊ लोळे यांपैकी एका नावाचा विचार सुरू असल्याचे सांगितले जाते. भोर तालुक्यातून पोपट सुके आणि स्वरूपा थोपटे विजयी झाल्या असून स्वरूपा थोपटे यांचेही नाव चर्चेत आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष शेखर वढणे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीतील युती, सभापतीपद आणि गटनेतेपदाबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविला आहे. जिल्हा परिषदेत भाजपचा गटनेता हा विरोधी पक्षनेता म्हणून भूमिका बजावणार असल्याने या निवडीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.