1190016586
– आरोपावरुन बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हा
पुणे, प्रतिनिधी : पुण्यातून धक्कादायक घटना उघडकीस आली असून, महावितरणच्या सेवानिवृत्त अधिकारी असलेल्या ज्येष्ठ नागरिकाने जमीन व्यवहारातून स्वत:ची फसवणूक झाल्यानंतर आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ज्येष्ठांना जमीन विकसित करण्यासाठी दिल्यानंतर त्यांची व्यवहारात फसवणूक झाली. (Shocking, senior citizen commits suicide due to fraud in land transaction) गृहप्रकल्पात सातव्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. ही घटना बाणेर भागात घडली असून, याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
नरेश उमाकांत महाजन (वय ६९, रा. अंबरनाथ पूर्व, जि. ठाणे) असे आत्महत्या केलेल्या ज्येष्ठाचे नाव आहे. याबाबत महाजन यांचा मुलगा मयूर नरेश महाजन (वय ४१, रा. अंबरनाथ पूर्व, जि. ठाणे) यांनी पुण्यातील बाणेर पोलिसांत तक्रार दिली आहे. महाजन यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन बांधकाम व्यावसायिक जयंतीलाल ताराचंद ओसवाल (वय ५६) आणि रिषभ ओसवाल (वय ३०, दोघे रा. भवानी पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, नरेश महाजन हे महावितरणमध्ये अधिकारी होते. ते अधिकारी असताना त्यांनी बाणेरमध्ये जागा घेतली होती. त्यांनी नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर ते मुलांसह अंबरनाथ येथे रहात होते. त्यांनी बाणेर येथील जागा स्विटी असोसिएटसचे जयंतीलाल ओसवाल यांना विकसित करण्यासाठी दिली. महाजन यांनी विकसित केलेल्या जागेवर मान्य केलेल्या करार, तसेच अटी आणि शर्तीनुसार ओसवाल यांनी या मिळकतीमध्ये फ्लॅट देतो, असे सांगितले होते. मात्र, कराराचे पालन न करता त्यांना फ्लॅट दिले नाही. महाजन यांनी याबाबत विचारण केली. पण, काहीही झाले नाही. यामुळे ते नैराश्यात होते. महाजन यांच्या जागेवर सात मजली इमारत उभारली गेली आहे. गृहप्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. पण, इमारतीतील अंतर्गत कामे सुरू आहेत. महाजन हे १६ फेब्रुवारी रोजी बाणेर येथील आवारात आले. त्यांनी कराराप्रमाणे फ्लॅट देण्याबाबत ओसवाल यांच्याकडे विचारणा केली. बांधकाम व्यावसायिकांनी त्यांना मानसिक त्रास देऊन धमकाविले. नंतर ते सातव्या मजल्यावर गेले. सातव्या मजल्यावरुन त्यांनी उडी मारुन आतम्हत्या केली, असे त्यांचा मुलगा मयूर याने तक्रारीत म्हटले आहे. मयूर यांच्या तक्रारीनुसार, बांधकाम व्यवासायिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहायक निरीक्षक अनिल केकाण तपास करत आहेत.