– महापौर निवडीआधी भाजपची तातडीची बैठक; अनुपस्थितीवर संताप – निवडीनंतर जल्लोषाला ब्रेक
पुणे, एकहाती सत्ता मिळविणाऱ्या पुण्यातील भाजपने सोमवारी होऊ घातलेल्या महापौर आणि उपमहापौर बैठकीपूर्वी रविवारी बैठक घेतली. बैठकीत शहर अध्यक्ष असलेल्या घाटे (School for newly elected corporators by “BJP’s” Ghate Guruji) गुरूजींनी नवनिर्वाचित नगरसेवकांची शाळा घेत त्यांना शिस्तीचा धडा शिकवला. वेळ न पाळणाऱ्यांना आणि अनुपस्थित राहिलेल्यांना जाहीर इशारा देत आता प्रायोरिटी ठरवा असेही म्हंटले. त्यामुळे शहरात या बैठकीची चांगलीच चर्चा झाली.
भाजपने यंदाच्या महापालिकेत अभुतपुर्व यश मिळवत तब्बल ११९ नगरसेवक निवडूण आणले. सोमवारी महापौर आणि उपमहापौर निवडीवर शिक्कामोर्तब होत आहे. यानिमित्ताने ही बैठक आयोजित केली होती. या आयोजित बैठकीला गटनेते गणेश बिडकर, महामंत्री राजेश पांडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. वरिष्ठांचे मार्गदर्शन असल्याने उपस्थिती अनिवार्य होती. तरीही काही नगरसेवक उशिरा पोहोचले, तर काहींनी दांडी मारल्याची बाब समोर येताच घाटे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “तुमच्या प्रभागातील नगरसेवक आले नाहीत, त्यांना फोन तरी केला का?” असा थेट सवाल करत घाटे म्हणाले, “आज लग्नतिथी असेल, कार्यक्रम असतील; पण इथून पुढे आपली प्रायोरिटी बदलावी लागेल. उद्या मतदानाची वेळ आली आणि तुम्ही वेळेत पोहोचला नाहीत तर त्याची जबाबदारी कोण घेणार ? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. नव्या सभागृहाकडे संपूर्ण पुणे शहराचे लक्ष असते, प्रत्येक हालचाल, प्रत्येक शब्द मतदार पाहत असतात, याची जाणीव करून देत त्यांनी स्पष्ट बजावले की, सूचना आल्या की उपस्थित राहणे बंधनकारक असेल. “आपण काय बोलतो, कसे वागतो, यावरच लोकांचा विश्वास ठरणार आहे,” असा इशाराही त्यांनी दिला.
महापौर निवडीनंतर उत्सव नाही
भाजपकडून महापौरपदासाठी मंजुषा नागपुरे आणि उपमहापौरपदासाठी आरपीआयचे परशुराम वाडेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असले तरी विरोधकांनी निवडणूक बिनविरोध होऊ दिलेली नाही. त्यामुळे उद्या मतदान होणार आहे.
मात्र, दिवंगत नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर भाजपने संयमाची भूमिका घेतली आहे. महापौर निवडीनंतर अभिनंदनाचा केवळ औपचारिक ठराव मांडला जाईल; *कोणताही जल्लोष किंवा शक्तिप्रदर्शन करू नका*, अशा स्पष्ट सूचना बैठकीत देण्यात आल्या. पुढील काळात मोठा कार्यक्रम आयोजित केला जाईल आणि त्यासाठी प्रदेशातील नेते उपस्थित राहतील, असेही सांगण्यात आले.