– शेअर ट्रेडिंगमधील जादा परताव्याच्या आमिषाने फसवणूक
पुणे, पुण्यात सायबर चोरीच्या घटना वाढत असतानाच आणखी एक धक्काप्रकार समोर आला असून, एका ज्येष्ठ वकिलांना सायबर चोरट्यांनी शेअर ट्रेडिंगमधील (Senior lawyer cheated by cyber thieves of Rs 14 crore) जादा परतावा मिळवून देतो असे आमिष दाखवून तब्बल १४ कोटी २५ लाख ६५ हजार ९६५ रुपयांना गंडा घातला आहे. विशेष म्हणजे ही फसवणूक ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीत घडली आहे.
याप्रकरणी ६८ वर्षीय वकिलाने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, मोबाईल धारक व विविध बँक खातेधारक यांच्यावर आयटी अॅक्ट तसेच फसवणूकीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार हे वकिल आहेत. दरम्यान, त्यांना ऑनलाईनच्या माध्यमातून सायबर चोरट्यांनी संपर्क साधला होता. त्यांना शेअर ट्रेडिंगची माहिती दिली. त्यानंतर त्यांना एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केले. त्यातून तक्रारदारांना इतर व्यक्तींना होत असलेला फायदा दाखविण्यात आला. त्यानंतर त्यांना एक लिंक पाठवून अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. तक्रारदारांनी ते अॅप डाऊनलोड केले. नंतर त्यांना या अॅपच्या माध्यमातून वेगवेगळ्या बँक खातेवर पैसे भरण्यास सांगितले.
तक्रारदारांनी थोडे-थोडे पैसे भरण्यास सुरूवात केली. तेव्हा त्यांना अॅपमध्ये त्यांचा पोर्टफोलिओ मोठ्या प्रमाणात दिसू लागला. त्यांना सायबर चोरट्यांनी दाम दुप्पट करून देण्याची बतावणी केली. त्यानूसार, तक्रारदारांनी त्यांच्या आमिषाला बळी पडत त्यांच्याकडून तब्बल १४ कोटी २५ लाख ६५ हजार रुपये उकळले. त्यानंतर त्यांनी अॅपमधून पैसे काढून घेण्याचे प्रयत्न केले. पण, ते होत नव्हते. त्यांनी सायबर चोरट्यांशी पुन्हा संपर्क साधला. विचारणा केली. तेव्हा त्यांना वेगवेगळ्या कारणांसाठी आणखी पैसे भरण्यास सांगण्यात आले. तेव्हा त्यांना फसवणूक होत असल्याचे ल७ात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. अधिक तपास पोलिस करत आहेत.