पुणे; पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने तीव्र आंदोलनकरत महानगरपालिकेच्या भवन रचना विभागातील कथित ढिसाळ, मनमानी व नियमबाह्य कारभारावर नाराजी व्यक्त केली.(Seniority ignored in the Municipal Corporation? – Congress strongly objects to the appointments in charge of the building design department) महत्त्वाच्या पदांवरील सर्व प्रभारी नेमणुका तात्काळ रद्द कराव्या, अशी मागणीही करण्यात आली आहे. शहर जिल्हाध्यक्ष अरविंद शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन सादर केले आहे.
काँग्रेसच्या निवेदनानुसार, तत्कालीन प्रभारी अभियंता, प्रभारी अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांच्याविरोधात यापूर्वी लेखी तक्रारी दाखल केल्या होत्या. मात्र या तक्रारींकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. उलट, भवन रचना विभागातील काही कार्यकारी अभियंत्यांना शहर अभियंत्यानंतर अत्यंत महत्त्वाचे मानल्या जाणाऱ्या अधीक्षक अभियंता पदाचा प्रभारी पदभार देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अधीक्षक अभियंता पदाच्या सेवा ज्येष्ठतेबाबत काही कार्यकारी अभियंत्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली असताना, हा विषय न्यायप्रविष्ट असतानाही संबंधित अधिकाऱ्यांना प्रभारी पदभार देण्यात आल्याचे निवेदनात म्हंटले आहे. सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी आणि तत्कालीन आयुक्तांनी सेवा ज्येष्ठता यादीचा चुकीचा व सोयीस्कर अर्थ लावून या नेमणुका केल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.
या नेमणुका शासकीय ठराव, नियम व न्यायालयीन तत्त्वांशी विसंगत असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे. तसेच नुकतेच बांधकाम विभागातील प्रभारी अधीक्षक अभियंता म्हणून नियुक्त करण्यात आलेले अधिकारी गेल्या सुमारे १५ वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अशा महत्त्वाच्या पदावर नियमानुसार पूर्णवेळ अधीक्षक अभियंत्याची नियुक्ती करणे आवश्यक असताना, मुंबई उच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय येण्यापूर्वीच घाईगडबडीत प्रभारी
पदभार देण्यात आल्याबद्दल काँग्रेसने तीव्र हरकत नोंदवली आहे.
कर आकारणी व कर संकलन विभाग तसेच बांधकाम/विकास विभागातील सर्व प्रभारी नेमणुका तात्काळ रद्द कराव्यात. अधीक्षक अभियंता पदाबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि सेवा ज्येष्ठतेच्या तत्त्वांनुसार काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी शहर जिल्हाध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केली आहे.