पुणे, पुण्यातील दांडेकर पुल परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली असून, दारूच्या व्यसनामुळे वडिल आणि मुलामध्ये वादविवाद झाल्यादानंतर मुलानेच वडिलांना पेट्रोल टाकून जाळल्याची घटना घडली.(Shocking! Drunk son pours petrol on father and sets him on fire; dies during treatment) गंभीर भाजलेल्या वडिलांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
रविंद्र भालेराव (वय ६१) असे या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी मुलगा सागर रविंद्र भालेराव (वय २७) याला अटक केली आहे. याप्रकरणी पर्वती पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
माहितीनुसार, रविंद्र भालेराव हे सुतारकाम करत होते आणि सागरही त्यांच्यासोबत काम करत होता. सागरला दारूचे व्यसन होते. ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी दारू पिल्यानंतर दोघांमध्ये जोरदार वाद झाला. रागाच्या भरात सागरने वाहनातील पेट्रोल काढून वडिलांच्या अंगावर टाकले आणि त्यांना पेटवून दिले. आगीचा भडका उडाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदत करत आग विझवली. मात्र रविंद्र भालेराव हे सुमारे ४५ ते ५० टक्के भाजले होते. त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले; उपचार सुरू असताना रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
घटनेनंतर पोलिसांनी सागर याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष महाले करत आहेत.