– शिरूरमध्ये उघडकीस प्रकार, पुणे पोलिसांची कारवाई; डॉक्टर व एजंट अटकेत
पुणे, प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असलेल्या ढोकसांगवी (पाचंगेवस्ती) गावातील ‘लाइफ केअर’ क्लिनिकमध्ये मोबाईल ॲपच्या माध्यमातून बेकायदेशीर गर्भलिंग निदान केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुणे पोलिसांच्या (Shocking; Fetal gender detection through mobile app, major police action) एका माहितीनंतर याठिकाणी छापा कारवाईकरून हा प्रकार उघडकीस आणला आहे. आरोग्य विभागालासोबत घेऊन केलेल्या कारवाईत पलिसांनी डॉक्टर व एजंटला अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात पीसीपीएनडीटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये एजंट नरेंद्र ठाकरे (रा. केसनंद) आणि डॉ. आकाश सुभाष मालगुंडे (वय ३५) यांचा समावेश आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर गुन्हे शाखेला तातडीने कारवाईचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट सातचे वरिष्ठ निरीक्षक संतोष सोनवणे व पथकाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले आणि ग्रामीण रुग्णालय शिरूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन धस यांच्या सहकार्याने संयुक्त सापळा रचला. बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ‘डमी’ रुग्णासह पथक रांजणगाव एमआयडीसी परिसरात पोहोचले. एजंट ठाकरे याने डमी रुग्णांना आपल्या वाहनातून क्लिनिकमध्ये नेले. तेथे मोबाईल ॲपला जोडलेल्या उपकरणाद्वारे सोनोग्राफी सुरू असतानाच पथकाने छापा टाकला. कारवाईदरम्यान गर्भलिंग निदानासंदर्भातील साहित्य तसेच गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचा साठा जप्त करण्यात आला. पंचनामा करून साहित्य ताब्यात घेण्यात आले आहे. गर्भलिंग निदान करणे व करवून घेणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा आहे. नागरिकांनी अशा प्रकारांची माहिती तात्काळ आरोग्य विभाग किंवा पोलिसांना द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.