पुणे; पुण्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून, एका तरुणाला जातीवाचक शिवीगाळ करत जबरदस्तीने शेण खाऊ घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार सोशल मीडियावर रीलच्या माध्यमातून व्हायरल झाल्यानंतर समोर आला. दरम्यान, याप्रकरणात पोलिसांनी तत्काळ स्वतःहून दखल घेत (सुमोटो) गुन्हा दाखल केला असून, तिघांना अटक केली आहे. त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.(Shocking incident of young man being force-fed cow dung in Pune)
बिपाशा उर्फ आकाश राजू माणिकम (रा. दाऊजी पाटील निवास, गुरूनानक कॉलनी, कात्रज), हेमंत गायकवाड आणि विराज सोले यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली असून न्यायालयाने तिला पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी गोरक्षणाचे काम करतात. ८ मार्च रोजी आंबेगाव पोलिस ठाण्यातील अमलदार मोबाईलवर सोशल मीडिया पाहत असताना त्यांना एक लिंक आढळली. त्या व्हिडिओमध्ये एक तृतीयपंथीय व्यक्ती २० ते २५ वर्षांच्या तरुणाला उद्देशून जातीवाचक शिवीगाळ करत असल्याचे दिसून आले.
तसेच त्या तरुणाला अश्लील हातवारे करत जबरदस्तीने शेण खायला घालण्यात आले आणि त्याला मारहाण करण्यात आल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा प्रकार सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास आंबेगाव पोलिस करत आहेत.