पुणे, पुण्याच्या वारजे माळवाडी भागातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून, पत्नीकडून होणारा छळ तसेच कौटुंबिक वादविवादातून पतीने चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेने वारजे माळवाडी मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी पत्नीवर गुन्हा नोंदवला आहे.(Tortured by wife; Husband commits suicide by jumping from fourth floor)
महेश दत्तात्रय क्षीरसागर (वय ४०, रा. गिरीधरनगर, वारजे माळवाडी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याबाबत दत्तात्रय बाबुराव क्षीरसागर (वय ६८, रा. गिरीधरनगर, वारजे माळवाडी) यांनी वारजे माळवाडी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी पत्नी प्रतिभा महेश क्षीरसागर (वय ३५, रा. शोभा हाईटस सोसायटी), दांगट इस्टेट, शिवणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार क्षीरसागर कुटूंब शिवणे येथील दांगट इस्टेटमधील शोभा हाईटस सोसायटी येथे राहण्यास आहेत. दरम्यान, २फेब्रुवारी रोजी हा प्रकार घडला आहे. माहितीनुसार, महेश क्षीरसागर यांचे शोभा हाईटस येथे सलुन आहे. सुमारे १३ वर्षापूर्वी त्यांचे लग्न झाले होते. परंतु, दोघा पतीपत्नीचे पटत नव्हते. त्यामुळे त्यांच्यात नेहमी भांडणे होत होती. कौटुंबिक वादातून गेल्या वर्षात प्रतिभा या माहेरी निघून गेल्या. नंतर महेश यांनी त्यांची समजूत काढून त्यांना परत घरी आणले होते. नंतर त्यांच्यातील वाद मिटला नव्हता. या कौटुंबिक त्रासाला कंटाळून महेश क्षीरसागर यांनी चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. महेश क्षीरसागर यांच्यावरील अंत्यसंस्कारानंतर धार्मिक विधी पार पडल्यावर त्यांच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक दीपाली लुगडे तपास करीत आहेत.