पुणे, प्रतिनिधी : कात्रज येथील मांगडेवाडीतील दगडांच्या खाणीत आढळलेल्या ४० वर्षीय महिलेच्या मृत्यूचा उलगडा झाला असून तो अपघात नसून खून असल्याचे निष्पन्न झाले आहे.(Woman found dead in Mangdewadi mine was murdered; 6 people arrested) दारूच्या नशेत झालेल्या वादातून सहा जणांनी महिलेला मारहाण करून खाणीत ढकलल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेने सहा आरोपींना अटक केली आहे.
अटक केलेल्यांमध्ये केशव कमलेश चौधरी (२०), सोन्या लक्ष्मण पवार (१८), अब्दुल मोहंमद शेख (२३), महादेव अर्जुन व्होरडे (४०), साई अमित पुजारी (१९) आणि सोहेल हानिफ खान (२१) यांचा समावेश आहे. यापैकी साई पुजारी व सोन्या पवार हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
असा उलगडा झाला गुन्ह्याचा
गेल्या आठवड्यात १० फेब्रुवारी रोजी दुपारी मांगडेवाडीतील खाणीत महिलेचा मृतदेह आढळला होता. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांच्या समांतर तपासात खूनाचा संशय बळावला. परिसरातील तब्बल ९७ सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण करण्यात आले. त्यातून ३५ संशयित वाहनांची छाननी करण्यात आली. तपासाची सूत्रे केशव चौधरी या रिक्षाचालकापर्यंत पोहोचली. त्याने रिक्षाच्या हूडमध्ये केलेला बदल संशयास्पद आढळल्याने पोलिसांनी त्याची चौकशी केली. सखोल तपासात त्याने गुन्ह्याची कबुली दिली व इतर साथीदारांची नावे उघड केली.
वादातून घडला प्रकार तपासानुसार, संबंधित महिला कोंढवा येथून कात्रजकडे जाण्यासाठी रिक्षात बसली होती. मात्र आरोपींनी रिक्षा कात्रजकडे न नेता मांगडेवाडीतील खाण परिसरात नेली. तेथे इतर साथीदारांना बोलावून सर्वांनी दारू पिली. कात्रजला न नेता अन्य ठिकाणी आणल्याबद्दल महिलेने जाब विचारल्यानंतर वाद झाला. त्यानंतर आरोपींनी तिला मारहाण करून खाणीत ढकलल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद बदलून आता अपहरण व खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट दोनच्या पोलिस निरीक्षक अश्विनी जगताप, सहाय्यक निरीक्षक अमोल रसाळ व त्यांच्या पथकाने केली. पुढील तपास सुरू आहे.