पुणे , प्रतिनिधी; पुण्यातील कॅम्प भागात शुल्लक कारणावरून एका आर्किटेक्ट तरुणाचा सहा जणांनी बेदम मारहाणकरून खून केल्याची धक्कादायक घटना घढली. चेष्टा-मस्करीत ‘शब्या’ म्हणल्यावरून हा खून झाल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. (Young architect murdered in Pune over ‘fee’)या घटनेमुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणाचौघांना अटक केली आहे.फैसल फारुख खान (वय ३०, रा. कौसरबाग कोंढवा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत चुलत भाऊ आदिल आरिफ खान (वय ३२, रा. कौसरबाग) यांनी लष्कर पोलिसांत तक्रार दिली आहे. याप्रकरणी अली अब्बास अश्रफअली सय्यद (वय २५ वर्षे, रा- भवानी पेठ), सोहेल युसुफ तांबोली (वय २२), अश्रफअली गफार सय्यद (वय ५५, दोघेही रा. म्हाडा कॉलनी, विमाननगर) बजाद अली सय्यद (वय ३५, रा- चुडामन तालिम, भवानी पेठ) यांना अटक केल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक संतोष खेतमाळीस यांनी दिली.
पोलिस माहितीनुसार, फैसल हा आर्कीटेक्ट होता. तो कोंढवा परिसरातील कौसरबाग येथे राहत होता. पूर्वी कॅम्प परिसरात राहण्यास होता. लष्करातील मस्जिदमध्ये तो नमाज पढण्यास येत होता. दरम्यान, कॅम्पमधील न्यू मोदीखाना मशिदीजवळ ही घटना घडली. आदिल खान आणि फैसल खान हे तेथे आले असताना आरोपी शाहबाज शेख याच्यासोबत त्यांची भेट झाली. त्यावेळी फैसलने चेष्टा-मस्करीत शाहबाजला ‘शब्या’ असे संबोधले. या गोष्टीचा राग आल्याने शाहबाज शेखने फैसलला कानाखाली मारली. नंतर दोघांत वाद झाले. वाद वाढताच शाहबाज शेखने आपल्या साथीदारांच्या मदतीने फैसल खानवर हल्ला केला. बजाद सय्यद, अली सय्यद, सोहेल तांबोली यांच्यासह इतरांनी धारदार चाकूने फैसलवर छाती, पाठ, हात आणि डोक्यावर वार केले. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून लष्कर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून चौघांना अटक केली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे कॅम्प परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.