xr:d:DAFsn7WZUOg:2152,j:6574553125999077508,t:24040204
- प्रथमच १५ हजार कोटींचा टप्पा पार
- महसूल वाढीच्या अंदाजांवरून ‘फुगवलेला बजेट’ अशी चर्चा
पुणे | प्रतिनिधी, पुणे महानगरपालिकेने आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मांडला असून, यंदाचा अर्थसंकल्प ऐतिहासिक ठरला आहे. सन २०२६-२७ चा अंतिम अर्थसंकल्प तब्बल १५ हजार ६६९ कोटी रुपयांचा सादर केला असून, प्रथमच १५ हजार कोटींचा टप्पा ओलांडला गेला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत सुमारे ७ हजार कोटींची मोठी वाढ नोंदवली गेली आहे. स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी मंगळवारी (दि.२४) मुख्यसभेत हा अर्थसंकल्प सादर केला.
पुणे महापालिका आयुक्तांनी नुकताच १३ हजार ९९५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते. मात्र, स्थायी समितीने महसूल वाढीच्या अपेक्षांवर आधारित सुधारित प्रस्ताव ठेवत तब्बल १,६७४ कोटींनी वाढवत अर्थसंकल्प मांडला आहे. मिळकतकर, शासकीय अनुदान आणि बांधकाम परवानग्यांमधून मोठ्या प्रमाणात अतिरिक्त उत्पन्न अपेक्षित असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामुळे हा अर्थसंकल्प ‘फुगवलेला’ असल्याची चर्चा पुणेकरांमध्ये आहे. अर्थसंकल्पात महिलांसाठी घोषणा, आरोग्य, वाहतूक व प्रदूषण, पर्यावरणासह इतर संकल्प जाहीर केले आहेत.
महिलांसाठी मोठी घोषणा
अर्थसंकल्पात महिला सशक्तीकरणावर विशेष भर दिला आहे. महिलांच्या नावावर असलेल्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या मिळकतींना ५० टक्के करमाफी देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. तसेच महिलांसाठी मोफत स्वच्छतागृहे आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण यांसारख्या योजनाही जाहीर केल्या आहेत.
आरोग्य क्षेत्रात मोठ्या योजना, पण शंका कायम
महापालिकेच्या आरोग्य सेवांसाठीही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. शहरातील ५३ बाह्यरुग्ण विभाग आणि २० प्रसूतिगृहांमधून मोफत सेवा दिली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. औषधांसाठी ८० कोटी रुपयांची तरतूद असून, बाणेर येथील कॅन्सर हॉस्पिटल, वारजेतील मल्टीस्पेशालिटी प्रकल्प आणि एमआरआय सुविधा उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, विद्यमान रुग्णालयांची स्थिती आणि डॉक्टरांची कमतरता लक्षात घेता अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
वाहतूक व प्रदूषणावर उपाययोजना
शहरातील वाहतूककोंडी आणि वाढते प्रदूषण लक्षात घेता १,००० ई-बसेस खरेदी करण्याची घोषणा करण्यात आली आहे. पुण्याची प्रदूषण पातळी ३५० पर्यंत पोहोचल्याचे मान्य करत ती ५० पर्यंत कमी करण्यासाठी विशेष वायू प्रदूषण नियंत्रण यंत्रणा उभारण्याचा दावा करण्यात आला आहे.
पर्यावरण आणि इतर प्रकल्प
पर्यावरणपूरक उपक्रमांसाठी तलाव स्वच्छता, उद्यान विकास आणि प्राणिसंग्रहालयासाठी ६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्राणिसंग्रहालयात झेब्रा, जिराफ आणि आफ्रिकन चित्त्यासारखे विदेशी प्राणी आणण्याची घोषणाही करण्यात आली आहे. मात्र, शहरातील मूलभूत सुविधांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून अशा प्रकल्पांना प्राधान्य दिल्याची टीका होत आहे.
विकास की आकड्यांचा खेळ?
एकीकडे सर्वांगीण विकासाच्या घोषणा, तर दुसरीकडे अंमलबजावणीतील जुने प्रश्न—अशा द्वंद्वात सादर झालेला हा अर्थसंकल्प पुणेकरांच्या अपेक्षा पूर्ण करेल की केवळ आकड्यांचा खेळ ठरेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.